अपयश म्हणजे जीवनाचा शेवट नाही, तर नव्या सुरुवातीची नांदी असते. हीच गोष्ट भारतीय क्रिकेटपटू वरुण चक्रवर्ती याने आपल्या जिद्दीने सिद्ध केली. एकेकाळी क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरलेला हा खेळाडू, ज्याचा क्रिकेटशी असलेला संबंध पूर्णपणे संपुष्टात आला होता, तोच पुढे जाऊन भारतीय संघाचा महत्त्वाचा गोलंदाज बनला!
एक स्वप्न... सतत धडपड... आणि अपयशाचा सुकाळ
वरुणला सुरुवातीपासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. पण या खेळाने त्याला काही दिलं नाही, तर केवळ अपयशच दिलं. ४० हून अधिक वेळा तो विविध संघांसाठी निवड चाचणीला गेला, पण प्रत्येक वेळी नकारच मिळाला. कधी तो फलंदाज म्हणून अपयशी ठरला, तर कधी गोलंदाजीत यश मिळालं नाही. अखेर, हार मानून त्याने वेगळा मार्ग निवडला—क्रिकेट सोडायचं आणि करिअर आर्किटेक्चरमध्ये करायचं!
पाच वर्ष आर्किटेक्चरचा अभ्यास, त्यानंतर तीन वर्षे नोकरी... पण ज्या क्रिकेटने त्याला अपयश दिलं होतं, त्याच क्रिकेटचं वेड काही त्याला सोडत नव्हतं. शेवटी त्याने वडिलांना फोन करून सांगितलं,
"पप्पा, ही नोकरी माझ्याकडून होत नाही. अजून एकदा प्रयत्न करू द्या. अपयशी झालो, तर कायमचा क्रिकेट सोडून देईन!"
त्याच्या जिद्दीला संमती मिळाली, आणि त्याने पुन्हा क्रिकेटकडे मोर्चा वळवला. वेगवान गोलंदाज होण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही अपयश! शेवटी त्याने एक शेवटचा निर्णय घेतला. "आता ऑफस्पिन गोलंदाज म्हणून प्रयत्न करतो!"
एक क्षण... जिथे संपूर्ण भारताचा श्वास अडखळला!
वरुण चक्रवर्ती आयपीएलमध्ये चमकला, आणि त्यातूनच भारतीय संघात निवड झाली. पण त्याचा सर्वात मोठा क्षण आला IND vs AUS वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये.
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज ट्रॅव्हिस हेड जबरदस्त फॉर्ममध्ये होता. शमी आणि पांड्याला तो निष्प्रभ करत होता. भारताच्या विजयाची आशा मावळत चालली होती, लोक टीव्ही बंद करू लागले होते.
अश्यातच कर्णधार रोहित शर्मा ने मोठा निर्णय घेतला—चेंडू वरुण चक्रवर्तीच्या हातात दिला!
वरुणने दुसऱ्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला बाद केलं!
क्षणात भारताच्या विजयाचा नकाशा तयार झाला. जे लोक निराश झाले होते, त्यांचे चेहरे आनंदाने उजळले. हा तोच वरुण होता, जो कधी क्रिकेट सोडून आर्किटेक्ट बनला होता. पण आज त्याने क्रिकेटच्या खेळपट्टीवर स्वतःच्या नावाचा सुवर्णकाळ रेखाटला!
ही गोष्ट केवळ वरुणची नाही...
वरुण चक्रवर्तीची कहाणी म्हणजे भारतातील प्रत्येक मध्यमवर्गीय तरुणाची गोष्ट आहे. जी मुले आपल्या स्वप्नांसाठी लढतात, अपयशाने खचून जातात, पण पुन्हा उभे राहतात! अनेक जण अपयशाच्या भीतीने आपली स्वप्ने दडपून टाकतात. पण वरुणने दाखवून दिलं—"एक अपयश म्हणजे संपूर्ण जीवनाचा पराभव नाही!"
आज जर वरुणने नोकरीवर समाधान मानलं असतं, तर तो कदाचित कुठल्या तरी ऑफिसमध्ये खुर्चीत बसून सिव्हिल प्लॅन्स काढत असता. पण त्याच्या एका निर्णयामुळे तो आज भारतासाठी खेळतो, लाखो तरुणांना प्रेरणा देतो!
शिकवण: अपयशानंतरही स्वप्न पहायला विसरू नका!
क्रिकेटमध्ये हार-जीत येत राहतील. पण भारतासारख्या देशात, जिथे एखादं गरीब मूलही चेंडू आणि बॅट घेऊन मैदानात उतरतं, तिथे वरुण चक्रवर्तीसारखे खेळाडू नेहमीच जन्माला येतील.
ही कहाणी शिकवते—अपयश आलं, तरी स्वप्न पहा... आणि कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण करा!

0 Comments