पुणे : भाजप नेते व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावर गजा मारणे टोळीकडून हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
पुण्यातील कोथरूड येथे देवेंद्र जोग या भाजपच्या कार्यकर्त्याला ‘बघितले म्हणून’ कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीतील गुंडांनी मारहाण केली होती. याप्रकरणी गजा मारणेचा भाचा बाबू पवार, विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ यांच्याविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गजा मारणेचा भाचा हा फरार आहे.या चौघांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
त्यासह टोळीचा प्रमुख गुंड गजा मारणेवर सुद्धा मकोका लावण्यात आला आहे, असे अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. ते पुणे पत्रकार संघात संवाद साधत होते.
अमितेश कुमार म्हणाले, “जोग प्रकरणात आमची भूमिका अत्यंत कडक आहे. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख गजा मारणे जरी घटनेच्या स्थळी उपस्थित नव्हता, तरी त्यालाही आरोपी केले आहे. त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. टोळीला नेस्तानाबूत करण्याची भूमिका पोलिसांची आहे. टोळीच्या सदस्यांची संपत्तीची, ‘आरटीओ’कडून वाहनांची, मोबाइल फोन संभाषण, महापालिकेला प्रॉपर्टीची माहिती मागवली आहे.”

0 Comments